पेल्टोफोरमचे पिवळे धमक तुरे डोकं वर काढायला लागलेत. सकाळीच नाचरा फॅनटेल फ्लायकॅचर सुरेल गात, शेपटीचा पंखा उघडून नाचून गेला. जांभळा झगमगीत सनबर्ड उच्चरवाची शीळ घालत सारखाच लक्ष वेधून घेतोय. भारद्वाजाचं कुटूंब जडपणे झाडावरून कुंपणावर, तेथून जमीनीवर असा प्रवास, लाल डोळ्यांनी चहुकडे सावधपणे पहात करतोय. भांडखोर खारी शेपटी उडवत स्वैरपणे छपरावरुन झाडावर पकडापकडी खेळताहेत.
कुठल्या संरक्षीत वनातल्या सहलीचे हे वर्णन नाहीय. शहरातल्या घराच्या खिडकीतून, गॅलरीतून दिसणारा हा देखावा आहे. कधी उन्हात फुलांतला मध टिपणारी फुलपाखरं दिसतात, मुंगुस कधी एकटा तर कधी मुलाबाळांसह झुबकेदार शेपटी फुलवत मान उंचावून माणकासारख्या डॊळ्यांनी पहात झुडुपात दिसेनासे होतात. बुलबुल दिसला नाही दिसला तरी त्याच्या गोड शीळेने आपण आल्याची वर्दी देतो. उन्हाळा सुरु होतोय. बाहेर पडलात तर कुठे बहावा पिवळे लोंबते घोस लेऊन सजलेला दिसेल. रखरखत्या रणरणत्या उन्हात गुल्मोहर कुठे पर्णहीन रक्तवर्णी फुलो-याचं सौदर्य दाखवतो तर कुठे गर्द हीरव्या पालवीची किनार ल्यालेली फुलभरलेली झाडं वेगळच रुप दाखवतात. सावरीच्या सुकलेल्या बोंडांतून निघणा-या तलम, पिसासारख्या म्हाता-या वा-यावर स्वैर विहार करताहेत
आजुबाजुला पाहिलं तर निसर्ग वेगवेगळ्या रुपात आपलं मन रिझवायचा प्रयत्न करत असतो. ते पहायची दृष्टी आपल्या जवळ असेल तर आयुष्यात रोज नवा आनंदाचा अध्याय उलगडत रहातो.
No comments:
Post a Comment