शेवटी आपलं दुख:च आपलं सोबती असतं
जन्मापासून मरेपर्यंत कायम साथीला असतं
लाडावू नये, कुरवाळू
नये
फार विचारपूस करू नये
सान आहे की वाढलं पाहू नये
फार झालं तर वाहू द्यावं डोळ्यांना,
बरं असतं
शेवटी आपलं दुख:च आपलं सोबती असतं
त्याची जातच अशी चिवट
सुखाच्या दुधात मिठाची चिमूट
क्षणात सगळं कसं नासवून टाकतं
नासलं तरी पाणी काढून पनीर करायचं असतं
शेवटी आपलं दुख:च आपलं सोबती असतं
दुख: शरीराचं, सहन
करता येतं
काही तरी उपायांनं कमी करता येतं
जिव्हारी दुखतं, त्याला
उपाय काय सांगा!
समजून आपलच, तरी
दूर ठेउन, तसंच
जगायचं असतं
शेवटी आपलं दुख:च आपलं सोबती असतं
दुख: म्हणजे असते सुखातली सावली
किंमत मोदाची नाही त्या वाचून जाणली
नकोसं झालं तरी फार गरजेचं असतं
आनंद तोलायचं तेच तर खरं माप असतं
शेवटी आपलं दुख:च आपलं सोबती असतं
जन्मापासून मरेपर्यंत कायम साथीला असतं
अनिरुद्ध