Wednesday, April 18, 2007

कोकण


भर दुपारी, तळपत्या उन्हात, उष्ण वार्याच्या झळा सोसत प्रवास करीत कोकणात, म्हणजे, गुहागरला पोहोचलो. वाटेत सोबतिला चहुबाजुने पिवळा धमक फ़ुललेला पेल्टोफोरम सोनफुलांचा सडा घालत होता. सावरिचा बहर कधींचाच उलटुन गेला होता, त्याची बोंडं फ़ुटुन म्हातारीचा कापुस वार्यावर उडुन कुठे झुडुपांच्या बुडाशी जमा झालेला होता. सावल्या लांब झाल्या आणी उन्हाचा ताप ओसरु लागताच थंड सावटाला बसलेली पाखरं हलु-बोलु लागली. खारुंड्या झाडावरुन धावताना एकमेकांना शिळ घालु लागल्या. वाहत्या पार्य़्राच्या स्वरात बुलबुल आणी दयाळ आपली गाणी गाउ लागले.
गेष्टहाऊसवर थोडं ताज तवानं होऊन आम्ही दर्याकडे प्रयाण केले. लाल नारिंगि सुर्याचा गोळा बुडुबुडु म्हणत असताना आम्ही पुळणीवर पोहोचलो. सुर्यास्तानंतरचे बदलते रंग पाहताना सांज गोळा झाली, आकाशाच्या अंधारात एक एक चांदणी जमा होत सारं आभाळ लखलखू लागलं. दुरवर सागरातल्या होड्यांवरचे दिवे हेलकावे खात, डोलत, त्या ताय्रांशी सलगी करु बघु लागले. सुखावणारा सावळा वारा अंगावर घेत थोडा वेळ तिथेच थांबुन, नंतर गावात पोटपूजेच्या शोधात निघालो.
पहाटे सुर्योदयापुर्वीच पुन्हा गार पुळणीवर फिरायला पोहोचलो. मोकळा किनारा, लाटाची गाज आणी सोबत मनाजोगते सोबती! माणसाला आयुष्यात आणखी काय हवं असतं? पाउलांशी फेसाळ लाटां, उजाडतांचा थंड वारा सुखानं अनुभवत असताना, गावाकडच्या माडांच्या झावळ्यांमधुन उगवणाय्र्या सुर्याचा उजेड दिसु लागला. उबदार किरणांना पाठीवर वागवत, पोटात जागणाय्रा भुकेला मान देत, मग, ताज्या गरम स्वादिष्ट बटाटा वड्यांच्या समाचाराला निघालो.
कोकणफेरीबद्दल अधिक काही पुन्हा कधी तरी.

No comments: