Sunday, April 22, 2007

प्रवास


केल्याने देशाटन.. वगॆरे प्रवासाचे फायदे थोरामोठ्यांनी वारंवार सांगीतले आहेतच. पण मला प्रवास का आवडतो? केवळ एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी नक्कीच नाही! एखाद्या वाहनात निवांत बसून, सर्व सुत्रें सारथ्याच्या हातात देउन, मजेत, खिडकी बाहेरील बदलती द्रुष्ये पहात, आपल्याच विचारात हरवून प्रवास करण्यासारख सुख नाही. ज्यांना वाहन चालवायला मनापासुन आवडतं, त्यांना हाच अनुभव लोंग ड्राइव्ह मध्ये मिळतो.
खय्रा सुखदायी प्रवासासाठी खिडकीजवळ बसणं फ़ार महत्वाचं! पाठीमागच सगळं जग विसरुन, खिडकीबाहेरच्या जगात स्वता:ला झोकुन द्यायचं. वेगानं मागे जाणय़्रा झाडां- घरांबरोबर आणि मॆलांच्या दगडांबरोबर, मनही धावु लागतं. रोजच्या जिवनातले ताण-तणाव, श्रम, कामांचा तोचतोपणा ह्यात गुंतलेले मनाचे धागे हळुहळु मोकळे होऊ लागतात. एखादं आवडतं गीत मनात रुंजी घालु लागतं, चाकांचा खडखडाट त्याला सहजच ताल धरतो आणि ब्रम्हानंदी टाळी लागते.
खिडकी नाहीच मिळली तर लक्ष सहप्रवाशांकडे वळवायचं. विविधतेनं संपन्न असं मोठं मजेदार नाट्य येथे उलगडत असतं. प्रत्येकाची बसायची नाही तर उभं रहायची पद्धत, बोलायची कींवा अगदी गप्प रहायची ढब, चेहय्रावरचे बदलणारे भाव, मधेच डुलकी लागल्यावर डोलणारं आणि हळुच शेजार्याच्या खांद्यावर विसावणारं डोकं, त्याचा त्रासीक चेहरा.. एकत्र असुनही स्वत:च वेगळेपण जपणारी प्रत्येक व्यक्ती सहप्रवाशांच्या सोबतिनं, पाण्यात साखर विरघळावी तशी, तेवढ्यापुरति का होइना, एकरुप होऊन जाते, चोरुन, आवरुन घेतलेली अंग मोकळि पडत जातात, खाण्याच्या डब्यांबरोबर, चुना-तंबाखुच्या देवघेवीबरोबर, मनातल्या सुखदुख:चे आणि अनुभवांचे कप्पेही हलकेच उलगडू लागतात. प्रवासापुरते कींवा कधी त्यापलीकडेही टिकणारे भावबंध निर्माण होतात.
वाटेतली थांबण्याची ठिकाणं, तेथलें आवाज, वास, चहा आणि खाण्यांच्या खास चवी, विक्रेत्यांच्या चित्रविचित्र ललकाय्रा, ससत बसुन आखडलेल्या शरीराला हातपाय ताणुन मिळणारा विसावा, आणि पुन्हा प्रवास सुरु. हेच तर साय्र्या आयुष्याचं सार आहे, कारण जिवन म्हणजे एक सततचा प्रवासच नाही का?

Wednesday, April 18, 2007

कोकण


भर दुपारी, तळपत्या उन्हात, उष्ण वार्याच्या झळा सोसत प्रवास करीत कोकणात, म्हणजे, गुहागरला पोहोचलो. वाटेत सोबतिला चहुबाजुने पिवळा धमक फ़ुललेला पेल्टोफोरम सोनफुलांचा सडा घालत होता. सावरिचा बहर कधींचाच उलटुन गेला होता, त्याची बोंडं फ़ुटुन म्हातारीचा कापुस वार्यावर उडुन कुठे झुडुपांच्या बुडाशी जमा झालेला होता. सावल्या लांब झाल्या आणी उन्हाचा ताप ओसरु लागताच थंड सावटाला बसलेली पाखरं हलु-बोलु लागली. खारुंड्या झाडावरुन धावताना एकमेकांना शिळ घालु लागल्या. वाहत्या पार्य़्राच्या स्वरात बुलबुल आणी दयाळ आपली गाणी गाउ लागले.
गेष्टहाऊसवर थोडं ताज तवानं होऊन आम्ही दर्याकडे प्रयाण केले. लाल नारिंगि सुर्याचा गोळा बुडुबुडु म्हणत असताना आम्ही पुळणीवर पोहोचलो. सुर्यास्तानंतरचे बदलते रंग पाहताना सांज गोळा झाली, आकाशाच्या अंधारात एक एक चांदणी जमा होत सारं आभाळ लखलखू लागलं. दुरवर सागरातल्या होड्यांवरचे दिवे हेलकावे खात, डोलत, त्या ताय्रांशी सलगी करु बघु लागले. सुखावणारा सावळा वारा अंगावर घेत थोडा वेळ तिथेच थांबुन, नंतर गावात पोटपूजेच्या शोधात निघालो.
पहाटे सुर्योदयापुर्वीच पुन्हा गार पुळणीवर फिरायला पोहोचलो. मोकळा किनारा, लाटाची गाज आणी सोबत मनाजोगते सोबती! माणसाला आयुष्यात आणखी काय हवं असतं? पाउलांशी फेसाळ लाटां, उजाडतांचा थंड वारा सुखानं अनुभवत असताना, गावाकडच्या माडांच्या झावळ्यांमधुन उगवणाय्र्या सुर्याचा उजेड दिसु लागला. उबदार किरणांना पाठीवर वागवत, पोटात जागणाय्रा भुकेला मान देत, मग, ताज्या गरम स्वादिष्ट बटाटा वड्यांच्या समाचाराला निघालो.
कोकणफेरीबद्दल अधिक काही पुन्हा कधी तरी.

Thursday, April 5, 2007

उन्हाळ्याची सुट्टी

सोनेरी पंखांचा ह्ळ्द्या सुंदर शिळ घालतो आहे. हवेतला उश्मा जिवाची काहीली करतोय. उन्हाळा सुरु झाल्याच्या खुणा पुन्हा नव्याने शाळा कालेजच्या दिवसांची आठवण करुन देत आहेत. ती दूष्ट परिक्षा आणी त्या नंतर उन्हाळ्याची सुट्टी. नुस्ती धमाल.कॆर्य़ा (मला कयरया म्हणायचय!), करवंद,जांभळं, करमळं, रांजणं,कोकंब, फणस,ताडगोळे .. केव्हडा तरी जंगलचा मेवा.दिवसभर उनाडायचं, पत्ते खेळायचे, ल्याडिस, झब्बु,बदाम सत्ती; आजच्या मुलांना हे सगळं अनोळखी वाटेल. लगोरी, वीटी-दांडु, खांब-खांबोळी, सुर-पारंब्या, सागर-गोटे, काच-पाणि.. केव्हडे तरी खेळ. कोणतेही खर्चिक कींवा महागडं सामान नको, शिकवायला कोच नको, मोठं खास तयार केलेलं पटांगण नको.अंगणात, ओसरीत,रस्त्यावर, वाडीत, माळ्यावर कींवा माळरानात, कुठेही खेळा.दिवस उतरणीला लागला की निघायचं समूद्रावर जायला.वाळुत पकडा-पकडी, उभा खोखो नाहीतर पाण्यात डुंबायच.रात्री जेवल्यावर उघड्या (ओपन ऐयर) चित्रपटग्रुहात सिनेमा पहायला जायचं. दर दिवसा आड नवा चित्रपट, सुट्टीत विस - पंचविस टुकार खेळ पाहीले जायचे.ऐखादा बरा असला तर पर्वणी!आणी सिनेमात कुणाला रस होता? बडबड, मस्ती, हेच उद्दीष्ट्य.नाहीतर रात्री परत पत्ते कुटायचे. कोणीतरी भुताच्या गोष्टी सुरु करयच्या. भिती वाटत असली तरी ऐकाव्याश्या वाटायच्या. मग काळोखात, काही करायला जायची वेळ आली की पंचाईत!सावल्यांमध्ये, हलणाय्रा पानांमध्ये नको ते आकार दिसायचे. घाबरलो सांगायची पण लाज;त्यात साप-किरडांचं भय.पण त्यातच मजा असायची.घामाच्या धारांनी पुन्हा मला गावी नेउन सोडलं.गेलं बालपण पुन्हा येणं नाही, पण गाव अजुन तसच आहे. आणि ती गावाला जायची ओढ ही!